- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.
१६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा खातमा होऊन भाजपाचा उदय झाला. त्या मागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न देशभरातील माध्यमे करीत आहेत. देशात मोदींची लाट होती, त्यामुळे असे घडले असा विश्लेषकांचा मुख्य सूर आहे. निवडणुका सुरू असताना पासून हा सूर आळवला जात आहे. पण, वस्तुस्थिती थोडीशी वेगळी आहे. देशात नरेंद्र मोदी यांची लाट नव्हती. लाट काँग्रेसविरोधाची होती. जे जे कोणी काँग्रेससोबत होते, ते बुडाले. जे काँग्रेसपासून दूर होते, ते वाचले. इतका सोपा अर्थ या निवडणुक निकालातून निघतो.
प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष संपुआ-१ मध्ये काँग्रेससोबत होता. परंतु, नंतर त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होणे पसंत केले. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना या निर्णयाचा फायदा झाला. त्यांच्या पक्षाला प. बंगालमध्ये घवघवीत यश मिळाले. तेथे काँग्रेसचा सफाया झाला, त्याच प्रमाणे डाव्यांचाही सफाया झाला. डाव्यांची उरलीसुरली ताकदही संपली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भाजपाला शिरकाव करता आला नाही. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला ज्या ताकदीने विरोध केला, त्यापेक्षा १०० पट जास्त ताकदीने नरेंद्र मोदी यांना विरोध केला. परिणामी ममता यांच्या पक्षाला लोकांनी भरभरून मते दिली. हेच ओडिशात घडले. ओडिशाचे मुख्यमंत्री यांच्या बिजू जनता दलाने काँग्रेस आणि भाजपा दोघांपासून अंतर ठेवले. त्यांचे तेथे पुन्हा सरकार बनले आहे. काँग्रेस प्रमाणेच भाजपाचेही येथे पानिपत झाले आहे. हेच तामिळनाडूतही घडले. जयललिता यांनी काँग्रेस आणि भाजपापासून अंतर ठेवले, त्यांच्या अद्रमुकला लोकांनी भरघोष मतांनी निवडून दिले. येथेही काँग्रेसप्रमाणे भाजपाचेही पानिपत झाले आहे.
याचा सोपा अर्थ असा की, जेथे जेथे काँग्रेस आणि भाजपा वगळून तिसरा पर्याय उपलब्ध होता, तेथे लोकांनी हा पर्याय निवडला. सहा महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेत हेच झाले होते. दिल्लीत आम आदमी पार्टीचा नवा पर्याय लोकांना मिळाला होता. सहा महिन्यांचा पक्ष असतानाही लोकांनी दिल्लीत आम आदमी पार्टीला २८ जागा दिल्या होत्या. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरqवद केजरिवाल यांनी जनमताचा आदर केला नाही. १९ दिवस सरकार चालवून उद्दामपणे राजीनामा दिला. त्यामुळे लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांना खड्यासारखे बाजूला सारले.
प. बंगालात ममता बॅनर्जी, ओडिशात नवीन पटनाईक आणि तामिळनाडूत जयललिता यांना जे जमले, ते महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जमू शकलेले नाही. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत पाट लावल्याने हे घडले आहेच, पण त्याची इतरही काही कारणे आहेत. त्याच आम्ही यथावकाश लेखाजोगा मांडणार आहोतच.
आणखी वाचा
मराठा आरक्षण दिले असते, तर हे हाल झाले नसते
रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना