-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.
"ब्र" या बहुचर्चित पुस्तकाच्या लेखिका श्रीमती कविता महाजन यांनी "बदलापूरची बखर" या नावाने नवीनच उपद्व्याप सुरू केला आहे. काल्पनिक पात्रे उभी करून बहुजन समाजाला बदनाम करायचे, असे एक षडयंत्र फार पूर्वीपासून मराठी साहित्यात सुरू आहे. कविता महाजन यांची "बदलापूरची बखर" याच षडयंत्राचा एक भाग आहे. पूर्वी कथा-कादंब-या आणि नाटकांमधून बदफैली पाटील उभा केला जायचा. अलिकडे हा प्रकार बंद झाला होता. कविताइंनी "सखूबाई सावळे" नावाचे पात्र निर्माण हा खंडीत प्रकार पुन्हा सुरू करून दिला आहे.
"बदलापूरच्या बखर" या नावाचा नवा ब्लॉग कविताताइंनी सुरू केला आहे. या ब्लॉगवर "सुर्वात" नावाचा पहिला लेख त्यांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी पेस्ट केला. नंतर तो लगोलग फेसबुकवर टाकला. हा लेख शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर २०१३ रोजी) आता एका दैनिकांच्या महिलाविषयक पुरवणीत छापून आला. या लेखाचा तीन आठवड्यांचा हा प्रवास आहे. हा लेख इतक्या झटपट प्रसिद्धीस का पावला याचे कोडे आम्हाला पडले होते. लेख वाचला आणि हे कोडे उलगडले. बहुजन समाजाची जबरदस्त बदनामी या लेखात करण्यात आली आहे. ब्राह्मणी मीडिया बहुजनांची बदमानी करण्याची एकही संधी सोडत नाही. मग कविताताइंनी लिहिलेला लेख तरी तो कसा सोडेल?
कविताताई यांनी लिहिलेला हा संपूर्ण लेख अत्यंत आक्षेपार्ह आहे. ही कहाणी सांगणा-या काल्पनिक पात्राचे नाव कविताताइ यांनी मोठ्या खुबीने सखूबाई सावळे असे ठेवले आहे. सखूबाई सावळेच का? अपर्णा कुलकर्णी, फुलराणी जोशी असेही एखादे नाव कविताताई आपल्या मानसपात्राला देऊ शकल्या असत्या. पण त्यांनी तसे केले नाही. तसे केले असते, तर ब्राह्मण समाजाची बदनामी झाली असती.
लेख मालेच्या पहिल्याच भागात सखूबाई सांगते की, तिला दोन सासूबाई आहेत. म्हणजेच, बहुजन समाजातील पुरूष मंडळी दोन-दोन बायका करतात, असा छुपा संदेश यातून कविताइंनी मोठ्या खुबीने दिला आहे. ब्राह्मण पुरूष दोन-दोन बायका करीत नाहीत, असे कविताताई यांना म्हणायचे आहे का? दोन बायकांचा दादला असलेल्या सास-यानंतर सखूबाईच्या लेखात दुसरे पात्र येते "ड्रिन्कर टेलर"चे. हा "ड्रिन्कर टेलर" बहुजन आहे की, ब्राह्मण कोणास ठाऊक? कविताताई यांच्या दृष्टीने तो बहुजनच असणार. ताइंच्या लेखी ब्राह्मण दारू पित नसणार बहुधा.
या लेखात कविताताई यांनी ग्रामीण म्हणून जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात बोलली जात नाही. ही सखूबाई आपल्या नव-याचा उल्लेख "ध्यान" असा करते. ग्रामीण महाराष्ट्रातील कोणतीही स्त्री आपल्या नव-याचा उल्लेख "ध्यान" असा करीत नाही. हा शब्द कविता ताई ज्या अर्थाने वापरतात त्या अर्थाने तो ग्रामीण भागाला परिचितच नाही. "ध्यान" या शब्दाचा सदाशिवपेठी अर्थ कविता ताई ग्रामीण महिलेच्या तोंडी घालित आहेत. काय पण होते रंगीत ध्यान । इकडे तिकडे लुडबूड छान ।। अशा ओळी असलेली एक कविता पूर्वी शालेय अभ्यासक्रमात होती.
कविता महाजन यांची ही सखूबाई एफवाय बीए अर्थशास्त्र शिकलेली आहे, असे स्वत:च सांगते. मग ती ग्रामीण कशी? या प्रश्नाचे उत्तर कविता ताईच जाणोत.
सखूबाईच्या तोंडचे काही बोगस ग्रामीण शब्द खाली देत आहोत. कंसात प्रमाण शब्द दिले आहेत :
येवड्यासाठी (एवढ्यासाठी)
टुकूरटुकूर (टकमका)
होवी (हवी)
होव्या (हव्या)
टेलराकडनं (टेलरकडून)
आदीच (आधीच)
हईत (आहेत)
शिकल्येय (शिकले आहे)
वरषं (वर्षे)
असे आणखी खूप शब्द आहेत. पण ते सारेच येथे देत बसत नाही. कविता महाजनांना आमची विनंती आहे की, त्यांनी बहुजनांच्या बदनामीचा हा उपद्व्याप थांबवावा. कविता महाजन फार पूर्वीपासून लिहित आहेत. तसेच २००९ पासून ब्लॉगलेखन करीत आहेत. त्यांच्या लेखनाला आम्ही या पूर्वी कधीही कसल्याही प्रकारे आक्षेप घेतलेला नाही. आताच तो का घेत आहोत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. झटपट प्रसिद्धीसाठी असले उपद्व्याप करणे, एका मान्यताप्राप्त लेखिकेला शोभणारे नाही.
आम्हीही उद्या अपर्णा कुलकर्णी-जोशी या नावाचे एखादे पात्र उभे करून लेखमाला सुरू केल्यास कविता ताइंना चालेल का? ताई सूज्ञ आहेत. आमच्या या लेखाला योग्य प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.