औरंगाबादपासून उत्तरेला सुमारे १५ ते २० किमी अंतरावर चौका हे गाव आहे. चौक्याच्या पूर्वेला डोंगर कपारीत सारोळा नावाचे गावाचे गाव आहे. सारोळ्याच्या डोंगरातून सुखना नदीचा उगम होतो. या उगमाच्या ठिकाणी सुखदेव बाबांचे ठाणे आहे. त्यांच्या नावावरूनच या नदीला सुखना हे हे नाव पडले आहे. मराठवाड्यात सुखदेव बाबांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सुखदेव बाबा चिरंजीव आहेत, असे मानले जाते. काही लोक असे मानतात की, सुखदेव बाबा हे कोणा एका व्यक्तीचे नाव नसून ती एक गादी आहे. तिच्यावर बसणाèया प्रत्येक अधिकारी पुरुषास सुखदेव बाबा असेच म्हटले जाई. हे योग्यही वाटते. कारण भारतात अनेक अशा गाद्या आहेत. उदा. शंकराचार्य. लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेले शेवटचे सुखदेव बाबा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्र्यत जिवंत होते, असे या परिसरातील आख्यायिकांवरून दिसते. हे सुखदेव बाबा ३५१ वर्षे जगले असे सांगितले जाते. औरंगाबाद परिसरात १८९५ ते १९०५ या १० वर्षांच्या काळात मानमोडीच्या काही साथी एका मागोमाग एक येऊन गेल्या. या साथीतून सुखदेव बाबांनी लोकांना वाचविले, असे सांगितले जाते. साथ संपल्यानंतर एकादशीचा मूहुर्त पाहून सुखदेव बाबा ध्यान लावून बसले. ध्यानात असताना लोकांच्या समोरच ते अंतर्धान पावले. ज्या ठिकाणाहून ते अंतर्धान पावले, त्या ठिकाणी एक गुहा असून गुहेत बाबांची ध्यायस्थ मूर्ती कोरलेली आढळते. शिल्प ओबड धोबड आहे. मी सतत तुमच्यासोबत राहीन, असे आश्वासन त्यांनी जाताना लोकांना दिले होते, अशीही आख्यायिका आहे. सुखदेव बाबांचा वंश मेंढपाळाचा आहे, असे सांगितले जाते. या वरून ते धनगर असावेत, असे मानायला जागा आहे. या परिसरात आजही धनगरांची संख्या मोठी आहे.
शेवटच्या सुखदेव बाबांनी पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथाचे गर्वहरण केल्याची आख्यायिका सांगितली जाते. सुखदेव बाबा दिवाळीला भ्रमंतीसाठी बाहेर पडत. चैत्र पाडव्याला परत सारोळा पर्वतावर येत. अशाच एका भ्रमंतीत त्यांची गाठ पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ याच्याशी पडली. सुखदेव बाबा दुपारच्या वेळी एका चिन्चेच्या झाडाखाली रस्त्यावरच झोपले. या रस्त्याने बाळाजी विश्वनाथ लवाजम्यासह जात होता. एक दरिद्री मेंढपाळ रस्त्यावर झोपलेला आहे, हे पाहून लवाजमा थांबला. बाळाजी विश्वनाथाला हे कळले तेव्हा त्याने बैराग्याला उचलून शेजारच्या ओढ्यातील तापलेल्या वाळूत फेकून देण्याचा आदेश सोडला. आघाडीच्या शिपायांनी सुखदेव बाबांना तात्काळ उचलून ओढ्यात फेकले. बाबा पाठीवर पडले. बाळाजी विश्वनाथाची स्वारी पुढे निघून गेली. काही मैल चालून गेल्यानंतर बाळाजीच्या पाठीचा दाह होऊ लागला. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तोपर्यंत संध्याकाळ झाली. आता मात्र, त्याला वेदना असह्य झाल्या. पाठीला मोठे मोठे फोड आले. सर्वांगात आग भडकली. वैद्यांना पाचारण करण्यात आले. वैद्याच्या औषधांनी कोणताही गुण पडला नाही. दुसèया दिवशी पाठीचे फोड फुटून त्यातून पाणी गळू लागले. या प्रकारामुळे बाळाजी विश्वनाथासह सर्वच घाबरले. बाळाजीच्या बायकोने पुरोहितास पाचारण केले. पुरोहिताने सांगितले की, श्रीमंतांकडून कोणा तरी संत पुरुषाला तसदी पोहोचली आहे. तोच यावर उपचार करू शकतो.
बाळाजी विश्वनाथाला तात्काळ आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला. तापलेल्या वाळूत फेकलेल्या दरिद्री मेंढपाळाचा शोध घेण्यासाठी स्वार रवाना करण्यात आले. स्वार आल्या मार्गाने परत गेले. बाबांना जेथे फेकले होते, त्या ओढ्यात स्वार पोहोचले. बाबा अजूनही पाठीवरच पडलेले होते. आता दुसèया दिवशीची दुपार झाली होती. बाबा तापलेल्या वाळूत विठ्ठल भजन करीत होते. स्वारांनी बाबांचे पाय धरले आणि झाला प्रकार सांगितला. पेशव्यांचा दाह दूर करण्यासाठी पेशव्यांच्या तळावर येण्याची विनंती बाबांना केली. बाबा म्हणाले, मी फक्त देवाचा विठ्ठलाचा आदेश मानतो. त्याच्या आदेशाशिवाय मी कोठेही जात नाही.
स्वार माघारी फिरले. मग स्वत: बाळाजी विश्वनाथ स्वत:च लवाजमा घेऊन सुखदेव बाबांकडे गेला. त्याने सुखदेव बाबांचे पाय धरून क्षमा मागितली. बाबांचे पाय धरताच बाळाजीच्या अंगाचा दाह संपला. पाठीवरचे फोडही नाहीसे झाले. त्यानंतर बाळाजी विश्वनाथाने सुखदेव बाबांचा उपदेश घेतला. आणि त्यांना गुरू करून घेतले.
ज्या चिन्चेच्या झाडाजवळ हा सर्व प्रकार घडला. त्या ठिकाणाची आठवण म्हणून सुखदेव बाबांचे एक भक्त लिम्बाजी पाटील यांनी एक गाव वसवले. या गावाला चिन्चोली लिम्बाजी हे नाव पडले. कन्नड तालुक्यातील आजचे चिन्चोली लिम्बाजी म्हणजेच सुखदेव बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव असावे, असा अंदाज आहे. तथापि, यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment