‘सैराट’ आणि ‘फँड्री’ फेम नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन काढलेला बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट वाङमय चौर्याच्या आरोपामुळे प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. आधी तेलंगना उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. अन् आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच चित्रपटावर बंदी घातली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटावरही कथा चोरीचा आरोप झाला होता. सततच्या कथा चोरीच्या आरोपांमुळे नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’च्या चित्रपटाच्या कथेवरही संशय व्यक्त होत आहे. ही कथाही मंजुळे यांनी चोरलेली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.
नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला होता. नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगना उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दावा मान्य करून ‘झुंड’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. शरद बोबडे, न्या. के. एस. बोपन्ना आणि व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या निरिक्षणाखाली हे प्रकरण कोर्टात सुरु होते. या तीन सदस्यीय न्यायपीठाने ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी देखील तेलंगना उच्च न्यायालयाच्या बंदीस मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवल्यामुळे ‘झुंड’चे प्रदर्शन आणखी काही काळ लांबणार आहे. या वादावादीमुळे चित्रपटाची प्रसिद्धी मात्र फुकटात होत आहे. याचा फायदा अर्थातच कथा चोर अण्णालाच होणार आहे.
सैराटची कथेवरही झाला होता चोरीचा आरोप
नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा नाथ माने यांच्या 'बोभाटा' या कादंबरीवरुन चाेरली होती. २०१६ मध्ये नाथ माने यांनी पनवेल कोर्टात मंजुळेंविरुद्ध खटला दाखल केला होता. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची विनंती नाथ मानेंनी न्यायालयास केली होती. तथापि, हे प्रकरण न्यायालयात तसेच पडून राहिले. वरच्या कोर्टात जाण्यासाठी लागणारा अमाप पैसा नाथ माने यांच्याकडे नव्हता. त्यामुळे माने यांच्यावरचा अन्याय तेव्हा दडपला गेला.
माने हे तेव्हा कामोठे परिसरात राहत होते. ते मूळचे साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. २०१० मध्ये त्यांनी 'बोभाटा' कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांनी माने यांची कथाच ढापून घेतली. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर माने यांना धक्का बसला. ‘सैराट’ फ्रेम-टू-फ्रेम ‘बोभाटा’ कादंबरीवर बेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. कादंबरीतील बहुतांश संवादही चित्रपटात जशास तसे उचलण्यात आले आहेत.
‘सैराट’ पाहिल्यानंतर नाथ माने झी आणि एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार इमेलद्वारे संपर्क साधला. तथापि, त्यांना कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावले. पण, त्यांचे दुर्दैव तेथेही त्यांच्या आड आले. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही.
नाथ माने यांना योग्य साथ मिळाली असती, तर नागराज मंजुळे यांच्या वाङमय चौर्याच्या कारवायांचा तेव्हाच भंडाफोड झाला असता. तथापि, मंजुळे यांचे दैव तेव्हा बलवत्तर होते. न्यायालयाने नाथ माने यांच्या तक्रारीची योग्य प्रकारे दखल न घेतल्यामुळे मंजुळे यांचे तेव्हा फावले. यावेळी मात्र मंजुळे यांना बरोबर वस्ताद भेटला आहे. या प्रकरणातून मान सोडवून घेणे मंजुळे अण्णास सोपे नाही. यानिमित्ताने भारतीय न्याय व्यवस्था मोठ्यांसाठीच कशी काम करते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गरिबांना न्याय देण्यास आपली यंत्रणा खरोखर हलेल तो सुदीन.