तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला
हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले.
ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला.
ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला. तुकोबा म्हणतात :
जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।
अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता.
तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा.
ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले.
तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले.
या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे.
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।।
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।।
(अभंग क्रमांक ३९१०)
अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.
जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।।
(अभंग क्रमांक ४३६९)
अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।
मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।
(अभंग क्रमांक ११४)
अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते.
सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।
चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।
तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।।
(अभंग क्रमांक ४२२७)
अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही.
संबंधित लेख