Saturday 21 September 2024

महात्मा गांधी आणि मीराबेन

-दत्तप्रसाद दाभोळकर
लोकसत्ता/ १७ सप्टेंबर २०२३
(मूळ शीर्षक : ‘शतप्रतिशत सत्य!’)

गांधीजींचे जीवन आणि तत्त्वज्ञान यांमुळे संमोहित होऊन त्यांच्याजवळ जगातील अनेक स्त्री-पुरुष आले. त्यात अर्थातच स्त्रियांची संख्या जास्त आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाच्या आहेत मीराबेन. त्यांची आणि गांधीजींची एकमेकांतील भावनात्मक गुंतवणूक विलक्षण आहे.

मीराबेन म्हणजे मॅडेलिन स्लेड. आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही, ही दर्पोक्ती बरोबर घेऊन जगभर हिंडणारे ब्रिटिश साम्राज्य. त्या साम्राज्याचे प्रमुख शक्तिस्थल म्हणजे त्यांचे नौदल. त्या नौदलाचे सर्वेसर्वा एडमॉन्ट स्लेड यांची ही लाडकी मुलगी. म्हणजे आपल्या परिकथेतसुद्धा मावणार नाही असे समृद्ध आनंदी बालपण तिला मिळालंय. तारुण्यात प्रवेश करत असतानाच ती बिथोव्हेनच्या संगीतात आकंठ बुडाली. हे संगीत खोल, गूढ, अंधारी गुहेत नेऊन आपल्याला अंतरात्म्याचा शोध घे म्हणून सांगते असे तिला वाटते. त्याच वेळी रोमारोला यांनी लिहिलेली बिथोव्हेन यांच्या आयुष्यावरील अकरा खंडांतील कादंबरी जिन ख्रिस्टॉफ तिच्या हातात पडते. तिच्या आणि रोमारोला यांच्या भेटी सुरू होतात. रोमारोला तिला सांगतात, ‘संगीत तू फक्त माध्यम म्हणून वापरत आहेस. तुझा खरा प्रवास आहे अंतरात्म्याचा शोध घेण्याचा. मी लिहिलेले हे गांधीजींवरील पुस्तक वाच. आज येशू ख्रिस्त पुन्हा मानवरूपात या जगात हिंडतोय हे समजावे म्हणून महात्मा गांधींना भेट.’

गांधीजींना भेटावयाचे, त्यांच्या आश्रमात राहावयाचे, त्यासाठी प्रथम आपल्याला तयार केले पाहिजे. एक वर्ष ही मुलगी असिधारा व्रत स्वीकारते. दारू, मांसाहार बंद. जमिनीवर झोपायचे. आध्यात्मिक साहित्य वाचायचे. दिवसातून दोनदा टकळीवर सूत कातायचे. एका वर्षांनंतर गांधी तिला आश्रमात येऊन राहण्याची परवानगी देतात. आश्रमातील आयुष्य यापेक्षा खडतर आहे, हे तिला समजते. ती ते सारे सहजपणे स्वीकारते. त्याच वेळी या आश्रमात कोणकोणत्या वाईट गोष्टी चालताहेत हे आपल्या भिरभिरत्या नजरेने टिपून त्यांना सांगते. गांधीजींचे जेवण, त्यांच्या वेळा, त्यांची विश्रांती, अंघोळीसाठी त्यांना लागणारे कोमट पाणी हे सारे आता मीराबेन बघताहेत. मुलीने थकलेल्या वडिलांची काळजी घ्यावी, आईने मुलाची काळजी घ्यावी असे काही.

मीराबेन यांचे आत्मचरित्र आपल्या दृष्टीने एका वेगळय़ा कारणामुळे फार महत्त्वाचे आहे. कारण मीठ सत्याग्रहापासून अगदी फाळणीपर्यंत गांधीजींच्या मनातील तगमग आणि त्या वेळी भोवताली नक्की काय घडत होते, याच्या आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींची तिने नोंद केली आहे. उदाहरणार्थ, फक्त दोन प्रसंग सांगतो.
भगतसिंगांना फाशी होईल म्हणून सारा देश केवळ अस्वस्थ नाही, तर प्रक्षुब्ध होता.. गांधींनी ‘भगतसिंगांना फाशी देऊ नका’ म्हणून व्हाइसरॉयला पत्र पाठवले होते. गांधी-आयर्विन करार करू शकणारे आपले नेते ही फाशी रद्द करू शकतील, असा जनतेचा विश्वास होता. मात्र गांधी कराचीला जाण्यासाठी रेल्वेत चढत असतानाच सरकारने भगतसिंग आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना फाशीवर चढवले. भगतसिंग यांच्या सुटकेसाठी एका शब्दानेही कधी काही प्रयत्न न केलेल्या संघटनेने आणि पक्षाने ही फाशी गांधीजींमुळे झाली हे आपल्या कुजबुज आघाडीतून सर्वत्र पसरवले. सुकुर या स्टेशनवर मध्यरात्री गाडी थांबली. संतप्त तरुण हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन गांधींना शोधत डब्यात डोकावत होते. गांधी झोपलेले. डब्यात फक्त मीराबेन आणि आणखी दोघे. मीराबेन यांनी डब्याच्या खिडक्या-दरवाजे बंद केले. गाडी सुरू झाली आणि डोके रक्तबंबाळ झालेला एक तरुण शौचालयाच्या खिडकीची काच आपल्या डोक्याने फोडून शौचालयाच्या दारातून रेल्वेच्या त्या डब्यात शिरला..

गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सामील झाले. मात्र, तेथे गोलमेज परिषदेला जायचे की नाही हे २६ ऑगस्टच्या व्हाइसरॉयबरोबर होणाऱ्या चर्चेत काय आश्वासने मिळतात यावर गांधी ते ठरवणार होते. २७ ऑगस्टला सकाळी मीराबेन यांना गांधीजी आपण जाण्याचे ठरल्याची तार मिळाली. बोट २९ ऑगस्टला सुटणार होती. पासपोर्टपासून बरोबर काय सामान घ्यायचे हे ठरवून मीराबेन आणि प्यारेलाल, महादेव असे फक्त तीन-चार जण त्यांच्याबरोबर बोटीवर आहेत. गांधीजींचा बोटीवरचा पहिला प्रश्न, ‘तुम्ही सामान म्हणून काय बरोबर घेतलंय?’ या चौघांनी भरपूर माहिती काढून, खूप विचार करून अगदी आवश्यक असे सामान सात-आठ मोठय़ा ट्रंक भरून बरोबर घेतलेले. हे समजल्यावर गांधी म्हणाले, ‘मला आणि तुम्हालाही अगदी आवश्यक तेच बरोबर असेल. फक्त एकदोन ट्रंकमध्ये मावणारे. बाकी सर्व वस्तू एडनला बोटीतून खाली उतरवा, नाही तर मी बोटीतून खाली उतरेन!’

त्या वेळी गांधींनी आपला वेश आणि दिनक्रम अजिबात बदलला नाही. गोलमेज परिषदेतील बोलणी संपवून गांधी रात्री एक वाजता परत आले, तरी पुन्हा पहाटे तीन वाजता गजर लावून उठत आणि या पहाटेच्या प्रार्थनेत या चौघांनाही सामील व्हावे लागे. आपल्या समोर येते ती युरोपातील गांधीजींची प्रचंड लोकप्रियता. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आवरता येणार नाही अशी तुडुंब गर्दी. गांधींच्या संरक्षणासाठी दिलेल्या साध्या वेशातील कमांडोने नोंद केली आहे- आम्ही राजघराण्यातील माणसांबरोबरही सर्वत्र हिंडलोय, पण अशी गर्दी कुठेच जमलेली नाही. पोपने त्यांना आग्रहाने व्हॅटिकन येथे येण्याचं आमंत्रण दिलंय आणि गांधीजींनी ते स्वीकारलंय. मुसोलिनीने त्यांच्याकडून वेळ मागितला आहे आणि गांधींनी तो दिला आहे. हे सर्व करत असतानाच गांधीजींनी पाच दिवस रोमारोला यांच्याबरोबर दिवसभर चर्चा केल्यात. त्या वेळी रोमारोला यांनी मित्रांना पत्र पाठवून कळवलंय, ‘या वेळी तुम्ही येथे हवे होतात. आध्यात्मिक उंची म्हणजे काय ते तुम्हाला समजले असते. आपण कसे आणि किती बदललो हे गांधींनी किती नेमके सांगितले. ते म्हणाले, ‘मी प्रथम परमेश्वर म्हणजे सत्य असे समजत होतो. आता मला समजलंय सत्य म्हणजे परमेश्वर.’

मी वर सांगतोय ते ‘कटोरी में गंगा’. स्वातंत्र्यलढय़ातील अनेक अज्ञात गोष्टी आपणासमोर उलगडत जातात. इंग्रजांचे दमनचक्र सुरू झालंय. सारे नेते तुरुंगात आहेत. गांधीजी आणि त्यांची चळवळ जगभर बदनाम केली जात आहे. भूमिगत होऊन या देशात काय चाललंय याचा सविस्तर वृत्तांत मीराबेन जगभराच्या वृत्तपत्रांना पाठवत राहतात. त्यांना एक वर्षांची शिक्षा होऊन आर्थर रोड तरुंगात ठेवतात. भोवताली फक्त अगतिक अवस्थेत देहविक्रय करणाऱ्या आणि त्याच मन:स्थितीत खून करणाऱ्या स्त्रिया. ती बाहेर आल्यावर गांधी तिला परदेशात जाऊन भारताचा स्वातंत्र्यलढा समजावून देण्यास सांगतात. मीराबेन इंग्लंड, अमेरिकेत भाषणे देतात. चर्चिल, मजूर पक्षाचे पुढारी यांना भेटतात. अमेरिकेत रुझवेल्टच्या बायकोला भेटतात. त्यानंतर आगाखान पॅलेसमधील गांधीजींच्या अटकेत तिच्या आणि गांधींसमोर महादेव आणि कस्तुरबा यांचा देहान्त झालाय आणि त्या गांधींना आधार देत उभ्या आहेत. फाळणीचे दु:ख, गांधीजींचा खून अशा अनेक घटना संयत, संयमी शब्दांत पण आपल्याला हलवून टाकत त्यांनी शब्दांकित केल्यात. त्यांची आणि गांधीजींची एकमेकांतील सहजसुंदर गुंतवणूक दाखविणारी काही पत्रे पुस्तकात आहेत. त्यातील एक. गांधीजी बोरसाडला आहेत. हवामान प्रचंड खराब, हिच्या प्रकृतीला हे झेपणार नाही. तू आता सेवाग्रामला जा, म्हणून गांधींजी चिडचिड करतात. रागावून तीपण सेवाग्रामला जाते. दुसऱ्याच दिवशी गांधींचे पत्र येते, ‘तू मनामध्ये सतत असतेस. मी चरखा चालू करतो, तुझी आठवण येते. पण आज त्याचा काय उपयोग? मात्र एक लक्षात ठेव. सारे सुख, सारी जवळची माणसे या सर्वाना सोडून माझी व्यक्तिगत सेवा करण्यासाठी तू आलेली नाहीस. तू मी जी मूल्ये जीवनात पाळतो, त्या मूल्यांचे आचरण आणि प्रसार करण्यासाठी आलेली आहेस. मात्र, येथे सर्व वेळ तुझे लक्ष माझ्यावरच केंद्रित केले होतेस. तुझ्या सेवेचा मी दुरुपयोग करून घेतो, असं मला वाटत राहिलं. त्यामुळे मी क्षुल्लक कारणावरून रागावत असे. मी तुझ्याकडून सेवा करत असताना माझी अग्निपरीक्षा अनुभवत होतो.’

मीराबेन तुरुंगात असताना, त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. त्यांना भेटायला आठवडय़ातून एक माणूस येऊ शकेल किंवा त्या आठवडय़ातून एक पत्र लिहू शकतील. त्यांनी अर्थातच दुसरा पर्याय निवडला आणि त्यांना पाठविलेल्या पहिल्या पत्रात गांधी लिहितात, ‘स्वत:ला शोधण्यासाठी तुरुंगासारखी दुसरी जागा नाही. तुला बायबल आणि येशू माहीत आहेत. आता कुराण आणि अमिर अलीचे ‘स्पिरीट ऑफ इस्लाम’ या पुस्तकांचा अभ्यास कर. वेद, महाभारत, रामायण, उपनिषदे वाच. तुला हिंदू तत्त्वज्ञानाचे अंतरंग समजेल.’

मीराबेन यांच्या या आत्मचरित्रात अशा अनेक गोष्टी आहेत त्यातील आणखी एक सांगतो, आपणाला डोळस करणारी- ‘तुला येशू ख्रिस्तांना भेटावयाचे असेल तर गांधींना भेट’ म्हणून सांगणारे रोमारोला गांधींना प्रथम भेटले ते गोलमेज परिषदेच्या वेळी आणि त्या वेळी जाताना ते मीराबेन यांना म्हणाले, ‘मुली, मला गांधीजींच्यात विवेकानंदांचा अंश दिसतो.’

‘मीराबेन : अंतरात्म्याच्या शोधात’,
मीराबेन (मॅडेलिन स्लेड)
अनुवाद – अनिल कारखानीस,
मॅजेस्टिक प्रकाशन,
पाने- ३१९, किंमत- ५५० रुपये