Tuesday 16 September 2014

अपाविमंने पूर्ण केली ५ लाख वाचने!

सप्टेंबर २०१४ च्या उदयाबरोबर 'अनिता पाटील विचार मंच'ने ५ लाख वाचनांचा टप्पा ओलांडला. ५ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग ठरला आहे. अवघ्या ३ वर्षांच्या अवधीत ५ लाख वाचने पूर्ण करणाराही हा मराठीतल एकमेव ब्लॉग आहे. वाचकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणे आम्हाला शक्य झाले. आम्ही सन्माननीय वाचकांचे ऋणी आहोत. हे प्रेम असेच टिकून राहील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. 

गेली दोन वर्षे संपादक मंडळ ब्लॉगचे काम पाहत असला तरी ब्लॉगच्या यशाच्या खऱ्या शिल्पकार ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील याच आहेत. महाराष्ट्राच्या मनात सलत असलेले प्रश्न अनिता ताई यांनी शोधून काढले. या प्रश्नांचा मूलगामी वेध घेऊन साध्या सोप्या शैलीत लेखन केले. ब्लॉगच्या तांत्रिक मांडणी आणि देखणेपणाकडेही तार्इंनी विशेष लक्ष दिले होते. अनिता ताई यांनी या ब्लॉगला दिलेल्या या आकारातच ब्लॉगचे यश सामावलेले आहे. 

अनिता ताई यांचा लेखनाचा झपाटाही मोठा. अवघ्या वर्षभराच्या काळात त्यांनी तब्बल १५० लेख ब्लॉगवर पोस्ट केले होते. हे सर्व लेखन तार्इंनी एकहाती केले होते. तसेच सर्व लेखांचे विषयही अत्यंत मूलभूत होते. तार्इंनी घालून दिलेल्या पायवाटेवरूनच संपादक मंडळ वाटचाल करीत आहे. ताई ब्लॉग लेखनापासून वेगळ्या झाल्या असल्या तरी, त्यांचे मार्गदर्शन संपादक मंडळाला नियमित लाभत आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक नवे विषय सूचविले, तसेच त्यांच्या मांडणीबाबतही मार्गदर्शन केले. संत जनाबाई यांच्या "घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिलापाशी ।।" या अभंग पंक्तीप्रमाणे त्यांचे बारीक लक्ष आहे, म्हणूनच संपादक मंडळ यशाच्या पायऱ्या चढू शकले. 

सन्याननीय वाचक आणि आदरणीय अनिता ताई पाटील यांचे ऋण व्यक्त करून हे निवेदन आम्ही येथेच संपवितो. 

-संपादक मंडळ, अनिता पाटील विचार मंच.

Monday 15 September 2014

पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातून सुटले

जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपका


- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का?  सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती. 
१. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. 
२. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले. 
वरीलपैकी दुसरया कारणांचा या लेखात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडगे याच्या निवेदनावरच गांधी हत्येचा संपूर्ण खटला उभा होता. बडगेने पोलिसांना सांगितले की, "महात्मा गांधी यांना मारण्यापूर्वी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईत जाऊन भेटला होता. सावरकरांनी गोडसेला 'यशस्वी होऊन या' असा आशीर्वादही दिला होता." बडगेने दिलेल्या या जबाबातील तथ्ये तपासण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही; त्यामुळेच सावरकर या खटल्यातून मुक्त होऊ शकले, असे कपूर कमिशनच्या अहवालातून समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसते. 

महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत. 

गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे. 

बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले. 

या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले. 

जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."

रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."

यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती. 

कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.

How Savarkar escaped the gallows

Wednesday 10 September 2014

ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले?

५५ कोटीं हा तर निव्वळ बहाणा


- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.



३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुण्यातील ब्राह्मण अतिरेकी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर हाताच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या. गांधी हत्येच्या खटल्यात शंकर किस्तैैया आणि मदनलाल पहावा हे दोन आरोपी वगळता सर्व आरोपी महाराष्टराष्ट्रातील होते. तसेच सर्वच्या सर्व जण ब्राह्मण होते. गांधी हत्येच्या आरोपींमध्ये विनायक दामोदर सावरकर, दिगंबर बडगे (हा नंतर माफीचा साक्षीदार बनला.),  नारायण आपटे, विष्णू करकरे यांचा सामवेश होता. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना बेरेट्टा जातीचे पिस्तुल खरेदी करण्यासाठी दत्त्तात्रय परचुरे आणि गंगाधर दंडवते यांनी मदत केली. हे दोघेही ब्राह्मणच होते. 

येथे प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महात्मा गांधी याना का मारले? ब्राह्मणांच्या मनात गांधीजींबद्दल असा कोणता राग होता?

या खटल्यातील एक आरोपी आणि नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात केलेल्या दाव्याचा थोडक्यात तपशील असा : "भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली..."

गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा बिलकूल खोटा आहे. पहिला मुद्दा असा की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते. 

दुसरा मुद्दा असा की, १३ जानेवारी १९४८ रोजी भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. म्हणजेच ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न ब्राह्मण करीत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो. 
महात्मा गांधी यांच्या हत्या कटातील आरोपींचा एकत्रित फोटो. उभे (डावीकडून) : शंकर किस्तैैया, गोपाळ गोडसे, मदनलाल पहावा, दिगंबर बडगे (माफीचा साक्षीदार).  खाली बसलेले (डावीकडून) : नारायण आपटे, विनायक दामोदर सावरकर, नथुराम गोडसे, विष्णू करकरे. 
मग प्रश्न उरतो की, ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले? या प्रश्नाची आम्हाला ३ प्रमुख उत्तरे आम्हाला सापडली आहेत. ही उत्तरे अशी : 

१. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते होते. इतकेच नव्हे, तर जगाच्या राजकारणावर त्यांच्या विचार-आचारांचा प्रभाव होता. असे असले तरी गांधी हे जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते.ब्राह्मणेतर माणसाचा एवढा गाजावाजा होणे हे ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते.

२. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, बहुजन समाजातीलच नव्हे, त्याकाळातील अनेक बडे ब्राह्मण नेते महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे यातील सर्वांत मोठे नाव. काश्मिरी ब्राह्मण असूनही नेहंनी गांधी यांचे अनुयायीत्व पत्करणे, ब्राह्मणवाद्यांना पसंत नव्हते. महाराष्टड्ढातूनही अनेक ब्राह्मण गांधीजींचे अनुयायी बनले होते. साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे. यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी खवळून उठले होते.

३. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. तुकाराम महाराज हे महाराष्टड्ढातील ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टसीने क्रमांक एकचे शत्रू होते. आणि नेमके त्यांनाच गांधीजींनी गुरुस्थानी मानल्याने ब्राह्मणवाद्यांचे पित्त न खवळते तरच नवल.

महात्या गांधी ब्राह्मण कुळात जन्मले असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केली नसती. त्याऐवजी त्यांचे मंदीर बांधून नित्यपुजा चालविली असती.

Thursday 4 September 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३

वेद प्रणित मार्गावर प्रहार

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.



जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर ब्राह्मण चवताळून उठवण्यास आणखी एक प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी वेद आणि स्मृतींनी प्रतिपादिलेल्या भेदभावकारक मार्गावर केलेला प्रहार होय. आधीच्या लेखांत म्हटल्यांप्रमाणे प्रत्यक्ष वेदांमध्ये भेदभावाला स्थान नसले तरी नंतरच्या स्मृती ग्रंथांनी वेदवाङ्मयास ब्राह्मणांच्या पायाशी आणून बांधले. ब्राह्मणांना फुकट बसून खाण्याची सोय आणि स्त्री-शुद्रांना फक्त ढोर मेहनत करण्याचे कर्तव्य, अशी व्यवस्था स्मृतींनी निर्माण केली. कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत, असा सिद्धांत ब्राह्मणांनी रुढ केला. त्यामुळे ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कुठलाही धार्मिक अधिकार उरला नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणांची सेवा करायची. या विषारी व्यवस्थेविरुद्ध तुकोबांनी बंड पुकारले.

वेदांचे करायचे काय?
वेदप्रणित धर्माचा भारतीय जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, वेदांना नाकारणारे पंथ पाखांड ठरतात. उदा. वेदप्रमाण्य नाकारल्यामुळे महानुभाव पंथाला मधली अनेक शतके जवळपास अज्ञातवासात काढावी लागली. अशा परिस्थितीत वेदांचे करायचे काय? असा प्रश्न तुकोबांसमोर होता. तुकोबांनी वेदप्रमाण्यावर कोणतेही भाष्य न करता, भेदभावावर प्रहार केला. तसेच वेद वेद काय करता, खुद्द वेदांनीच विठ्ठलाची महती गायली आहे, असे सांगून ब्राह्मण धर्मावर कडी केली. ही मात्रा उत्तम लागू पडली. लोकांच्या झुंडी तुकोबांचा उपदेश ऐकायला येऊ लागल्या. तुकोबा त्यांना सांगत :
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला ।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।
कर्मकांड सोडा. विठोबाला शरण जा आणि नामस्मरण करा. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, खुद्द वेदांनीच हे सांगितले आहे, असे तुकोबा या अर्भगात म्हणतात.
तुकोबांच्या या मुत्सद्दीपणावर ब्राह्मण हडबडले. काय करावे, हे त्यांना कळेना. अशातच काही ब्राह्मण मंडळींनी तुकोबांचा अनुग्रह घेतला. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी प्रचार सुरू केला की, "नुसते भजन म्हटल्याने कुठे देव गवसतो का, त्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते अनुष्ठाने आणि इतर कर्मकांडे करणे आवश्यक आहे", असा प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. त्यावर तुकोबांनी ब्राह्मणांना थेट आव्हान देत म्हटले की, ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।
तुकोबा म्हणतात, ब्राह्मणांना काहीच कळत नाही. नामस्मरणाने नक्की इश्वर भेटतो. नारायणाचे नाम घेणे हेच आचमन आणि संध्या होय. नित्य भजन हेच ब्रह्मकर्म होय.

कोणत्याही प्रकारे अर्थ समजून न घेता, वेदमंत्रांची घोकमपट्टी करणाèया ब्राह्मणांना तुकोबांनी वेडगळ म्हटले. तुकोबा म्हणतात : वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।
याच अर्भगात तुकोबांनी उच्छेद जाला मारगाचा असे म्हणून तुकोबांनी वेदमार्गाला पूर्ण पराभूत केले आहे. 

ब्राह्मणांच्या पोषाखीपणावर प्रहार
कर्मकांडे नष्ट करायची असतील, तर ब्राह्मणांचे ब्राह्मणपणा ज्या बाबींवर अवलंबून आहे, त्यावर प्रहार करायला हवा, हे ओळखून तुकोबांनी शेंडी, जाणवे, सोवळे या बाह्य संकेतांवर जोरदार प्रहार केला. "शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।" या अभंगात तुकोबांनी केलेला प्रहार किती घातक होता, हे लक्षात येते. तुकोबा म्हणतात की, शेंडी आणि जाणवे यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील.शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तू खरा ब्राह्मण होशील. 
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वेदप्रणित मार्गाचा उच्छेद करीत असताना तुकोबाराय नामस्मरणाचा सोपा पर्यायी मार्गही त्यासोबत देत आहेत. 

लेखात आलेले अभंग
(या लेखात आलेल्या अभंग पंक्ती पुढील अभंगांतून घेतल्या आहेत. देहू संस्थानने छापलेल्या गाथ्यातून या अभंग संहिता घेतल्या आहेत. वाचकांच्या सोयीसाठी गाथ्यातील अभंग क्रमांक अभंगांच्या शेवटी दिले आहेत.) 

ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।१।।
लहान थोरासी करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ।।ध्रु।।
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ।।२।।
केशव नारायणा करिता आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ।।३।।
नामे करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायी ।।४।।
तुका म्हणे हे चि निर्वाणीचे शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगी ।।५।।
(अभंग क्रमांक ४३५६) 
अर्थ : परब्रह्म हे नामामुळेच प्राप्त होते, हे वर्म ब्राह्मणाला कळत नाही. म्हणून माझी सर्व लहान थोरांस विनंती आहे की, त्यांनी नारायणाला मनी धरावे. श्रीपतीची आठवण मनात ठेवा ही माझी सर्वांना विनंती आहे. साधे पाणी पिताना केशव नारायणाची आठवण काढली की संध्या आणि स्नानादी कर्म होऊन जाते. भोजन करताना नामस्मरण केले की सर्व प्रकारची ब्रह्मकर्मे आपोआप पूर्ण होतात. तुकोबा सांगतात की, नामस्मरण हेच निर्वाणीचे शस्त्र आहे, म्हणून नामस्मरण करा.

वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।१।।
विठोबाचे नाम सुलभ सोपा रे । तरी एक सरे भवसिंधू ।।ध्रु।।
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ।।२।।
तुका म्हणे विधी निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ।।३।।
(अभंग क्रमांक ३१५) 
अर्थ - वेदांचे पठण करणा-यांनाही ते काय वाचित आहेत, हे कळत नाही. तसेच वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही इतरांना (स्त्री-शुद्रांना) नाही. वेद वाचण्यापेक्षा विठोबाचे नाम घेणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. विठूनामाच्या स्मरणानेच भवसिंधू तरून जाता येईल. वेदांतील मंत्र-तंत्र जाणत्या लोकांनाही असाध्य आहेत, मग अज्ञानी लोकांची काय कथा? तुकोबा म्हणतात की, विठोबाच्या सोप्या नाम मार्गाने व्यर्थ विधिनिषेध सांगणारा वेदाचा मार्ग लोपला आहे. वेदाच्या मार्गाचा पूर्ण उच्छेदच झाला आहे. 

वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ।।१।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।ध्रु।।
सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतका चि निर्धार ।।२।।
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।३।।
(अभंग क्रमांक ४०४९) 
अर्थ - वेदाने अनेक प्रकारची बडबड केली आहे. पण त्यातून त्याने एकच गोष्टशोधली. ती म्हणजे विठोबाला शरण जाणे आणि त्याचे नाम गाणे. सर्व शास्त्रांचा शेवटी हाच विचार आणि निर्धार आहे. तुकोबा सांगतात की, अठरा पुराणांत विठोबाला शरण जाणे हा एकच सिद्धांत आणि हेतू आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक ३९१०) 
अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.